खाद्यपदार्थांचं भन्नाट मॉडेलिंग!
साक्षी नाटेकर
फूड स्टायलिंग प्रकाराशी ओळख भूषण (लेकाच्या मित्राचा बाबा) ने करून दिली. भूषण इनामदार हा पुण्यात बोटावर मोजण्याइतक्या फूड स्टायलिस्ट मधला एक होता. त्याची वेबसाईट www.bhushanfoodstyling.com जी आता आम्ही पुढे चालवतोय ती बघितली तर तो त्याच्या कामात किती अव्वल स्थानावर होता याची कल्पना येईल.
एकदा उत्सुकतेपोटी भूषणला तू नक्की काय करतोस विचारलं, तेंव्हा त्याने जे सांगितलं ते ऐकून आपण पण असं काहीतरी भारी करावं अशी प्रबळ इच्छा झाली खरी पण आयटी मधुन फूड इंडस्ट्री मधे जाणे, नोकरी सोडून व्यवसायात उतरणे, बैठ्या कामाची सवय असताना तासनतास उभ्याने काम करणे हा यू टर्न सोपा नव्हता. आणि तेंव्हा तरी शक्य नव्हता. तरी ही भूषणाने पदार्थ चिरताना, शिजवताना आणि सर्व्ह करताना प्रत्येक स्टेप मधे सौंदर्य शोधण्याबद्दल सांगितलं ते नकळत कुठेतरी गोंदवले गेलं असावं. कोणती भाजी कशी चिरली की छान दिसते, कोणत्या दोन भाज्या एकत्र ठेवल्या की रंग उठून दिसतो हे बघायची सवय लागली. भूषण अचानक गेल्यानंतर प्राचीने ते काम सुरू ठेवले याचा मनोमन आनंद झाला होता आणि आता ७-८ वर्षानंतर मला जॉईन होण्याबद्दल विचारलं हा तर क्लायमॅक्स होता.
नोकरीतून व्यवसायात पडल्यावर सगळ्यात मोठा बदल घडतो जो तुम्हाला पण माहितच असेल तो म्हणजे अनियमित वेळा. क्वचित कधी ६-७ तासात शूट संपतो तर कधी १६-१७ ते २० तास पण काम करावं लागतं. घराला आधी असं एक माणूस कुठल्याही वेळी घरी येतंय हे पचवायला जरा कठीणच गेलं पण आता जरा सावरताय. प्राचीबरोबर काम करायचं म्हणजे नक्की काय काय करायचं आहे हे मलाही माहीत नव्हतं. पण आता ४-५ महिन्यात जितकं समजलंय तितकं सांगायचा प्रयत्न करते.
स्टायलिंग कशासाठी करायचं तर वेगवेगळी कारणं आहेत. स्टायलींग करून काढलेले फोटो रेस्टॉरंट मधे, मेन्यू कार्ड मधे लावण्यासाठी, पॅकेजिंग साठी आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे सोशल मिडिया साठी! सोशल मिडिया मधे फेसबुक, इंस्टा तर आहेच पण क्लाउड किचन वर फोटो टाकण्यासाठी सुद्धा आम्ही स्टायलिंग केलं आहे.
स्टायलिंग म्हणजे काय ह्याचं सोप्पं उत्तर म्हणजे फोटोसाठी पदार्थ सजवणं ज्यामुळे बघणार्याच्या तोंडाला पाणी सुटेल. उदाहरण द्यायचं तर फक्त पांढऱ्या इडलीचा फोटो काढला तर तितका अपील होणार नाही जितका त्याबरोबर लाल सांबार आणि हिरवी चटणी ठेवल्यावर होईल. प्लेन पिवळा ढोकळा बघण्या ऐवजी त्यावर चार काळे मोहरीचे दाणे, एक हिरवेगार कोथिंबीरीची पान आणि हिरवी मिरची किंवा
चिंचेची चटणी ठेवली तर पटकन ढोकळा उचलून खावासा वाटेल. ही सौंदर्यदृष्टी तर असायला हवीच पण तसंच कुठल्या पदार्थाबरोबर काय ठेवायचं किंवा काय ठेवून त्याला सजवायच ते माहित हवं. अस्सल महाराष्ट्रीयन चिकन रश्श्यावर छान दिसते म्हणून पार्सली ठेवली तर नाही चालणार. उपासाच्या पदार्थाबरोबर कितीही छान दिसल्या तरी कांद्याच्या चकत्यांना बिग नो.
स्टायलिंग चे काम एकट्याने करणे थोडे अवघड असते. कूकिंग, स्टायलिंग आणि अरेंजमेंट सगळं एक माणूस एका वेळी करू शकत नाही. त्यामुळेच इथे टीम वर्क ला खूप महत्त्व आहे. आम्ही दोघे किंवा तिघे काम करत असू तर एक जण एका डिश चे स्टायलींग करत असेल तोवर दुसरी/ रा त्यानंतर च्या डिश ची क्रॉकेरी पुसून ठेवणे, कोरडे पदार्थ भरून ठेवणे, कणिक भरायची असेल तर ती भरून ठेवणे अशी तयारी करतात. मग यात कुणाची स्किल्स काय आहेत ते बघून कोण काय काम करणार ते साधारण ठरवतो. अर्थात सर्व प्रकारच्या कामाची सवय हवीच.
मी यात का शिरले तर याचं उत्तर निव्वळ आनंद! रोजच्या स्वयंपाकाचा कंटाळा कधीतरी येतोच पण नवनवीन पदार्थ कधी युक्तीने, कधी कौशल्याने आणि त्याच बरोबर सफाईने तयार करायचे, मांडायचे हे सगळं मला समाधान देतंय. जे कधी करायला मिळालं नाही ते करायला मिळंतय. आपले पदार्थ लाइमलाइट मधे येतायत हे सुख आहेच! प्रत्येक शूट संपवून घरी गेलो की आपण आपले १००% दिल्याचं समाधान वाटतंच.
Hay we all were always fascinated by Bhushan’s work. Team BFS is working hard to make his dream come true. Best of luck to you all.
Thanks Saee!